चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचा “पत्रकार दिन “उत्साहात संपन्न

0
15

चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचा ‘पत्रकार दिन’ उत्साहात संपन्न

*डॉ. आनंदराव कुळे संपादक
मानवाधिकार २४ न्यूज

मूल :चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचा ‘पत्रकार दिन
वर्ष २०२६ हे वर्ष चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे वर्ष राहिल. मराठी पत्रकार भवनाच्या नूतणीकरणाचे कार्य प्रगति पथावर आहे. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिला अभिवादन करुन आपण समाजासाठी मार्गदर्शक पत्रकारिता करू या. असे विचार चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडूभाऊ लडके यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन मंगळवार दि.६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. दै. सन्नाटा कार्यालय,मनपा व्यापार संकुल, गांधी चौक, चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय प्रतिनिधी मुरलीमनोहर व्यास आणि बबनराव बांगडे यांनी पुष्पमाला अर्पण करुन आदरांजली वाहिली.
याप्रसंगी मुरलीमनोहर व्यास म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचे बिजारोपण केले पण आज मराठी पत्रकारितेचा वटवृक्ष झालेला आहे. पत्रकारिता केवळ वृतपत्रिय राहिली नसुन इलेक्ट्रॉनिक आणि दृश्यश्राव्य झालेली असून आतातर मोबाईल मुळे सोशल मिडियाचा इतका विकास झालेला आहे कि प्रत्येक जण स्वतःला पत्रकार समजून वाटेल ते, वाटेल त्या भाषेत लिखाण करू लागला आहे. ही प्रवृत्ती समाजासाठी घातक आहे. सोशल मीडियाचा उपयोग सामाजिक एकता, समरसता,प्रेम, सदभाव आणि राष्ट्रप्रेम विकसित करण्यासाठी होणे आवश्यक आहे.
जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री. दीपक देशपांडे यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करीत उपस्थित सगळ्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देताना आपल्या वक्तव्यातून आज पत्रकारितेचा विकास विस्तृत झालेला आहे मात्र पत्रकारितेची मुल्ये बदलली असून सोशल मिडिया मुळे आज पत्रकार आणि पत्रकारितेची व्याख्या बदलण्याची वेळ आलेली आहे असे वाटते, आणि त्यामुळे पत्रकार कुणाला म्हणावे असा प्रश्न उपस्थित झालेला आहे व समाजाचा पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला असून आजच्या परिस्थितीत ह्याबाबत सगळ्यांनीच गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, आणि म्हणूनच खऱ्या पत्रकारांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे असे मत व्यक्त केले.
केंद्रीय प्रतिनिधी बबन बांगडे व सरचिटणीस सुनील तिवारी यांनी देखील याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस सुनील तिवारी यांनी तर आभार प्रदर्शन रवि नागपूरे यांनी केले. या प्रसंगी सौ. शोभाताई जुनघरे, नामदेव वासेकर, विजय लडके, जयंत पाडवाड आदि पत्रकारांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here