डॉ. आनंदराव कुळे,संपादक
मूल (मानवाधिकार २४न्यूज ):- मूल तालुक्यात अनेक गावातील मागील कित्येक वर्षांपासून जबरान जोतधारक शेतकरी शेती करीत आहेत. त्यांना जमिनीचे पट्टे द्यावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. ५) दुपारी १२ वाजता जबरानजोत धारक शेतकऱ्यांनी तहसील मूल वर मोर्चा काढला होता. यावेळ शेती आमची हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.
तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी धानाचे पीक घेतात. अनेक नागरिक भूमिहीन असल्याने वनविभागाच्या व महसूल च्या जागेवर अतिक्रमण करून मागील कित्येक वर्षांपासून उत्पन्न घेत आहेत. मात्र शासनाने त्यांना अजूनही मालकी हक्काचे पट्टे दिले नाही. मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे,यासाठी यापूर्वीही अनेक आंदोलने झाली. त्यावेळी त्यांना फक्त आश्वासने दिली होती. मात्र, अद्याप पूर्तता न झाल्याने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी मूल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. अतिक्रमित शेतीचे तत्काळ पट्टे द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. मोर्चात जानाळा, आगळी, फुलझरी, कांतापेठ व चिरोली येथील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.










