
आनंदराव कुळे, संपादक
(मानवाधिकार २४ न्यूज ):- चंद्रपूर जिल्ह्याचा आरोग्य कणा असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची विदारक अवस्था पाहून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले. गुरुवारी दुपारी त्यांनी रुग्णालयाला दिलेल्या ‘आकस्मित भेटी’ दरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले. जिल्ह्याचे तापमान ४० अंशांच्या पार असतानाही रुग्णांच्या नातेवाईकांसाठी साधे कुलर नसणे, पिण्याच्या पाण्याची दयनीय अवस्था आणि कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी गायब असल्याचे पाहून खासदारांनी अधिष्ठातांसह उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.रुग्णालयातील स्वच्छतेवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात मात्र सगळीकडे घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरली आहे. फुटलेल्या नाल्या, महिला प्रभागातील तुंबलेली घाणेरडी स्वच्छतागृहे यामुळे रुग्णांचे आरोग्य सुधारण्याऐवजी अधिकच धोक्यात आले आहे. “स्वच्छतेचा पैसा जातो कठे?” असा जळजळीत सवाल करत, महिलांना मिळणारी ही वागणूक आणि आरोग्याशी होणारी तडजोड कदापि सहन केली जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत खासदारांनी प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर प्रहार केला.
या गंभीर समस्यांची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. महिला विभागातील पाणीपुरवठा सुरळीत करणे, पिण्याच्या पाण्याचा दर्जा सुधारणे आणि संपूर्ण परिसरातील घाण साफ करून व्यवस्था तातडीने सुधारण्याचे निर्देश त्यांनी दिले. जर ८ दिवसांच्या मुदतीत परिस्थितीत सकारात्मक बदल दिसला नाही, तर प्रशासकीय स्तरावर कठोर कारवाई प्रस्तावित करून स्वतः रुग्णालयात बसून उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

