सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर शेत शिवारात वाघीणीचा मृत्यू; हल्ल्यात वनरक्षक सज्जन बारेकर गंभीर जखमी

0
96

आनंदराव कुळे, संपादक

मूल (मानवाधिकार २४ न्यूज ) : – सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर शेतशिवार परिसरात आज दि. २६ एप्रिल २०२६ एक धक्कादायक घटना घडली. ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपक्षेत्रातील रत्नापूर येथे टी -८४ या वाघीणीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या घटनेत एका वनरक्षकाला गंभीर दुखापत झाली आहे.
दुपारी सुमारे १२. ३० वाजताच्या सुमारास रत्नापूर परिसरातील मक्याच्या शेतात एक वाघीण फिरत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ही माहिती गावात पसरताच अनेक नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली. गर्दी वाढल्यामुळे वाघीण अस्वस्थ झाली आणि तिने लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पुढे सरसावलेले वनरक्षक श्री. सज्जन बारेकर यांच्यावर वाघीणीने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हल्ल्यानंतर वाघीण जवळच्याच शेतात जाऊन बसली. मात्र, सुमारे अर्ध्या तासानंतर म्हणजेच दुपारी १.०० वाजताच्या सुमारास वाघीण मृत अवस्थेत आढळून आली. वाघीणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला असून त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपवनसंरक्षक (ब्रम्हपुरी), सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू), सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव), तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी, स्थानिक वन्यजीव तज्ज्ञ आणि इतर अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.
मृत वाघीणीचे वय अंदाजे ९ ते १० वर्षे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पुढील तपासणीसाठी तिचे शव सिंदेवाही येथील मध्यवर्ती काष्ठ भांडारात नेण्यात आले. तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने शवविच्छेदन केले. तसेच अधिक तपासासाठी आवश्यक नमुने (विसेरा) जतन करण्यात आले आहेत.
शवविच्छेदनानंतर सर्व अधिकाऱ्यांच्या आणि पंचांच्या उपस्थितीत वाघीणीचे दहन करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, वाघीणीच्या मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतरच स्पष्ट होणार असून वनविभाग या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here